नांदेड : कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीला शाळा सोडण्याचा दाखला हवा होता, त्या बदल्यात कुलरची मागणी करणाऱ्या प्राचार्य मनोहर पवार व मुख्याध्यापक बहिनाजी वरवंटे यांच्याविरुध्द नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाराची मुलगी ही मास्टर दीनानाथ मंगेशकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोमठाणा (ता. नायगाव) येथून १२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाली आहे. तक्रारदारांनी त्यांच्या मुलीचा टीसी काढण्यासाठी उपरोक्त शाळेत जाऊन संस्थाचालक मनोहर पवार यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदाराला त्यांच्या मुलीचा टीसी हवा असेल, तर १२ हजार रुपये किमतीचे सिंफनी कंपनीचे कुलर आणून द्या, अशी मागणी केली. तेव्हा तक्रारदाराने नाईलाजास्तव होकार दिला. परंतु, वस्तूची मागणी लाच असल्याने त्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे दिली.
पडताळणीत यातील आरोपी मुख्याध्यापक तथा प्राचार्य बहिनाजी वरवंटे याने त्यांच्या मोबाईलवरुन मनोहर पवार याला संपर्क केला. त्याच मोबाईल फोनवरून तक्रारदाराला त्यांच्या मुलीची १२ वी उत्तीर्ण झाल्याची टीसी मिळणे संबंधाने बोलले असता त्यांनी तडजोडीअंती रुपये ३ हजार रुपये पंचासमक्ष मोबाईलवरून मागणी करून लाच रक्कम कॉलेजचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य वरवंटे यांच्याकडे देण्याचे सांगून लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
नंतर तक्रारदार हे शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य बहिनाजी वरवंटे यांच्याकडे मुलीची टी.सी. संबंधाने बोलले असता त्यांनी मनोहर पवार यांच्या मागणी प्रमाणे लाच रक्कम घेऊन या, असे म्हणून पंचासमक्ष रु. ३ हजारांची रक्कम लाच म्हणून देण्यास तक्रारदाराला प्रोत्साहित केले. या प्रकरणी कुंटुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पर्यवेक्षण अधिकारी प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.