छत्रपती संभाजीनगर: चोरट्यांनी पत्नीला जंगलात पळवून नेले, असा खोटा फोन करणाऱ्या मद्यपीवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी चंद्रकांत खिल्लारे (वय ३५, रा. कबीर नगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने १२ जून रोजी रात्री साडेनऊ वाजता धुळे-सोलापूर हायवे लगतच्या कांचनवाडी परिसरातून पोलिसांच्या ११२ मोबाईलवर फोन केला. मी दुचाकीवर जात असताना तीन इसमांनी अडवले व माझा मोबाइल हिसकावून घेतला. तसेच सोबत असलेल्या पत्नीला जंगलात घेऊन गेले, अशी माहिती दिली. घटना गंभीर आहे, असे समजून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यावेळी आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवित होता. पोलिसांनी चौकशी केली असता, आरोपीने खोटा फोन केल्याचे उघड झाले. असा खोटा फोन करणाऱ्या मद्यपीवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.