परभणी : माझ्या भाचीचे फोटो इन्स्टाग्रामवर का टाकत आहेस, अशी विचारणा करण्यासाठी आरोपीकडे गेलेल्या पिडीतेच्या मामास मारहाण करून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या संदर्भात मारहाणीत जखमी झालेल्या धर्मापुरी येथील मामाने मंगळवारी (दि.८) नवा मोंढा पोलीस ठाण्यास माहिती दिली. शनिवारी (दि.५) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शहरातील परभणी आयसीयू जवळील ग्लोबल लॅब येथे काम करणाऱ्या त्यांच्या ओळखीतील सुनिल बाबाराव यवतकर याला भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी यवतकर याला त्यांच्या भाचीचे फोटो इन्स्टाग्रामवर का टाकतो आहेस, अशी विचारणा केली.
यावेळी यवतकर याने त्यांच्या भाची आणि त्याचे अफेअर होते. तुम्ही तिचा दुसरीकडे विवाह केला. तिचा संसार टिकू देणार नाही. तुला काय करायचे ते कर असे म्हणून शिवीगाळ केली. चापट बुक्याने मारहाण केली. याचवेळी लॅब समोरील फरशीचा तुकडा हातात उचलून घेवून यवतकर याने मामाच्या पायावर मारून त्यांना जखमी केले. यावेळी आरोपीने पुन्हा भाचीबद्दल विचारणा करण्यास आला, तर जिवे मारील अशी धमकी दिली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देवून मामाला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मंगळवारी डिस्चार्ज झाल्यानंतर या घटनेसंदर्भात माहिती देण्यात आली. या माहितीवरून आरोपी सुनील बाबाराव यवतकर याच्या विरूध्द नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुरनं १३७/२०२५ मध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५ (२), ११८ (२), २९६, ३५१ (२), ३५१ (३), ३५२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.