छत्रपती संभाजीनगर : नर्सरी प्रवेश म्हटला की आता पालकांना धक्काच बसायला लागला आहे. कारण अगदी पहिलीपासून दहावीपर्यंत पूर्वीच्या मुलांचे जेवढ्या पैशात शिक्षण झाले तितका खर्च केवळ नर्सरी प्रवेश घेताना येतो. नर्सरी शिक्षणातून पालकांची लूट होतांना दिसत आहे. ही लूट थांबवण्याची मागणी होत आहे.
इंग्रजी शाळांचे फॅड नागरीकांमध्ये आल्याने गल्लोगल्ली इंग्रजी शाळा सुरु झाल्या आहेत. गल्लोगल्ली सुरू असलेले प्ले स्कूल, नर्सरी किंवा प्री-स्कूलकडून एका वर्षाचे किमान एक लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येते. विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक अर्थात नर्सरी प्रवेश घेताना आकारले जाणारे शुल्क बऱ्याच पालकांना परवडण्यासारखे नसते. केवळ आपल्या मुलाने चांगल्या शाळेत शिकावे यासाठी पालकांचाही मोठ्या शाळांमध्ये घालण्याचा अट्टहास असतो. यासंदर्भात साधारण दोन वर्षांपूर्वी शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा लागू करण्यात आला होता.
त्यावर सरकारने समितीदेखील नेमली होती. पण, याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. दरवर्षी प्रवेश प्रक्रियेच्या वेळी पालकांना खिसा हलका करावाच लागतो. खासगी शाळांचे गणवेश, बूट, ड्रेसकरिता विशिष्ट दुकाने कमिशन तत्त्वावर ठरवून दिलेले असतात. शंभर रुपये किमतीचा शर्ट तीनशे साडेतीनशे रुपयांपर्यंत विकला जातो. जो गणवेश तीनशे रुपयांना मिळायला पाहिजे, तो गणवेश ७०० ते ९०० रुपयांना विकला जातो. तर दीडशे दोनशे रुपयांना जो बूट मिळतो; तो बूट साडे तीनशे-चारशे रुपयांना पालकांना खरेदी करावा लागतो.