लातूर : आज पुन्हा लातूरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लातूर-बीड महामार्गावरील कोळगाव तांडा या गावात अपघात झाला आहे. या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कालच लातूरच्या निलंगा- देवणी महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात कार मधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच उदगीरच्या लोहारा पाटी इथे नवरदेव आणि चुलत भावाचा अपघातात मृत्यू झाला होता. अशातच आता आज पुन्हा लातूर मध्ये अपघात झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आज पहाटे ११ एप्रिल रोजी लातूरच्या बीड महामार्गावरील कोळगाव तांडा इथे अपघात झाला आहे. भरधाव कारला कट मारल्यानंतर गाडीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीला कट मारल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार डिवाइडरला धडकून हा भीषण अपघात झाला. या अपघातात मल्लिकार्जुन कनडे आणि राहुल कनडे या दोन पिता पुत्रांचा जागीच मृत्यू झाला तर गाडीमधील इतर चार व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आहे.
या अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचा पुर्णपणे चुराडा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. अपघातातील जखमींना लातूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच रेनापुर पोलिसांनी पंचनामा करत पुढील तपास करत आहेत.