लातूर : पोलिस केस मागे घ्या, मला दहा लाख रुपये द्या म्हणून शिवीगाळ करून फिर्यादीसह पत्नी, मुलगा आणि मुलीला मारहाण केल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी लातुरातील श्यामनगर येथे घडली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल आहे.
सूरज रमेश वाघमारे (रा. चाकूर) याने फिर्यादी विजय हरिश्चंद्र कांबळे (वय ५७ रा. ढोकी ह. मु. श्यामनगर, लातूर) यांना घरात घुसून ‘तुम्ही माझ्या कुटुंबांवर ढोकी (जि. धाराशिव) पोलिस ठाण्यात केलेली केस मागे घ्या आणि मला दहा लाख रुपये द्या. तुम्ही मला पैसे कसे देत नाही’ असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी फिर्यादी व त्यांची पत्नी, मुलगा, मुलीला मारहाण केली. याशिवाय जिवे मारण्याची धमकी देखील दिली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.