परभणी : बुडतीचे पाय डोहाकडे आहेत. देवेंद्र फडणवीस आता माझ्याबरोबर गोरगरीब मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत आहेत. माझ्यावर एवढे जळू नका, आम्ही मागतोय ते आरक्षण द्या, पण तसे होत नाही. फडणवीस, तुमच्या वागण्यामुळे मोदींचाच ‘करेक्ट’ कार्यक्रम होईल. ‘फडवणीस तुम्ही माझ्या नादाला लागू नका, तुम्ही चुकीच्या माणसाला खेटताय, तुमचा सुपडासाफ होईल’, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
परभणीच्या मानवत शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानात रविवारी मनोज जरांगे यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मनोज जरांगे पुन्हा एकदा राज्याचा दौरा करत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी परभणी जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी बोलताना त्यांनी फडणवीस यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. नऊ वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी मारली, तिच्यात तुम्हाला तुमची मुलगी दिसत नाही का? असा सवाल जरांगेंनी फडणवीसांना विचारला. महत्वाचे म्हणजे फडवणीस मला संपवणार आहेत. त्यांना देव मानणाऱ्या एकाने मला सांगितले असा गौप्यस्फोट जरांगे पाटील यांनी केला.
या वेळी जरांगेंनी भुजबळ यांनादेखील डिवचले. “छगन भुजबळ आठ दिवसांपासून गार पडले आहेत. हिमालयात जाऊन बसले आहेत का? असे म्हणत आपण ओबीसीमधूनच आरक्षण घेणार, एक इंचही मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जरांगे पाटील म्हणाले की, “बुडतीचे पाय डोहाकडे आहेत. देवेंद्र फडणवीस आता माझ्याबरोबर गोरगरीब मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत आहेत. माझ्यावर एवढे जळू नका, आम्ही मागतोय ते आरक्षण द्या, पण तसे होत नाही. फडणवीस यांच्या वागण्यामुळे मोदींचाच कार्यक्रम होईल. गोरगरीब मराठा समाज एकदा पण केला की तो पूर्णच करतो. तुम्हाला तुमचा पण पूर्ण करायचा आहे, आम्ही देखील आमचा पण पूर्ण करू.”