छत्रपती संभाजीनगर : सद्या सणासुदीचा काळ सुरु झाला असून नवरात्रीचा उत्सवही तोंडावर आला आहे. नवरात्री उत्सव म्हटलं की तर दांडिया आणि गरबा हे ओघाने आलंच. उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून (ता. ३) नवरात्रोउत्सवास सुरुवात होत असून यानिमित्ताने ठिकठिकाणी दांडिया तसेच गरबा उत्सवाचे आयोजन केले जात आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगर शहरात दांडिया खेळण्यासाठी किंवा बघण्यासाठी येणाऱ्या महिला किंवा पुरुषाच्या कपाळावर टिळा असायला हवा, असा फतवा काढण्यात आला आहे.
दांडियाच्या कार्यक्रमात येणाऱ्या व्यक्तींनी हिंदू पोशाख देखील परिधान केलेला हवा, असंही आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील काही पोस्टर्स सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या पोटर्सची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवरात्रीच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील ठिकठिकाणी आयोजकांनाबाहेती घेतल्या. दांडिया आणि गरबा उत्सवामध्ये फक्त हिंदूंना प्रवेश द्या, अशा सूचना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सर्व आयोजकांना देण्यात आल्या आहेत.
दांडिया खेळण्यासाठी, पाहण्यासाठी येणाऱ्यांना आधार कार्ड, पारंपरिक हिंदू पेहराव आणि कपाळावर टिळा असल्याशिवाय गरब्यात प्रवेश न देण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगरमधील आयोजकांकडून घेण्यात आला आहे. एकीकडे विश्व हिंदू परिषदेही गरबा कार्यक्रमात फक्त हिंदू धर्मीयांना प्रवेश द्या, त्यासाठी आधार कार्ड तपासा. प्रवेशद्वारावर टिळा लावूनच प्रवेश देण्यात यावा, असे आवाहन करणारे पत्र गरबा आयोजकांना पाठवले आहे. दुसरीकडे संभाजीनगरच्या पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेविषयी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.