धाराशिव : महसूल विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि जबाबदार कर्मचारी हा तलाठी असतो. गावातील नागरिकांच्या समस्यांचे निकारण करण्यासाठी तलाठ्यांना तलाठी व पंचायत कार्यालयात नेमण्यात आलेले असते. गावातील जमिनीच्या नोंदी, शेतकऱ्यांशी संबंधित महत्वाच्या विषयावर गाव तलाठ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. मात्र, अनेकदा तलाठ्यांबद्दल तक्रारी येत असतात. तलाठी लाच घेतल्याशिवाय कोणतेच काम करत नाहीत, असाही समज नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे, तलाठी हे पद नेहमीच चर्चेत असते. अशातच धाराशिव जिल्ह्यातील एका तलाठ्याचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ समोर आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तहसील कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत हे तलाठी पोहोचले होते. तलाठ्याच्या हा अवतार पाहून सरकारी कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली. विशेष म्हणजे कायम वर्दळीचे ठिकाण असलेल्या परंडा तहसील कार्यालयातील जाण्या-येण्याच्या ठिकाणीच नशेमध्ये धुंद झालेला तलाठी झोपल्याचे दिसून आले. त्यामुळे, तहसील प्रशासनातील अनेक कर्मचारी आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी तलाठ्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमल्यानंतर आता या मद्यधुंद तलाठ्याचे करायचं काय, असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला होता. त्यानंतर तहसील प्रशासनाने रुग्णवाहिकेला बोलावून रुग्णावाहिकेतून सबंधित तलाठ्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
गुणाजी ढोणे असं मद्यधुंद अवस्थेतील तलाठ्याचे नाव आहे. परंडा तहसील कार्यालयात ते अनेक वर्षांपासून कर्मचारी आहेत. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून ढोणे हे कोणतीही सूचना न देता गैरहजर राहिले होते. त्यांच्या या वर्तनाबद्दल संबंधित तहसिलदारांनी त्यांना नोटीसही बजावली होती. पण, त्यांनी या नोटीसीला कुठलेही उत्तर दिले नाही. तहसिलदारांनी पाठवलेल्या नोटीशीला उत्तर न दिल्याने संबधित तलाठ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. दरम्यान, संबंधित तलाठ्याने अगोदरही दारु पिऊन कार्यालयात येण्याचा प्रकार केल्याने त्यांना समजही देण्यात आली होती.