छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेत आत्महत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बजरंग चौक परिसरात शनिवारी (ता 24) ही दुर्दैवी घटना घडली आहे. प्रतीक्षा प्रीतम गवारे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 महिन्यांपूर्वीच प्रतीक्षाचा विवाह प्रीतम गरवारे या तरुणासोबत झाला होता. काही दिवसांच्या सुखी संसारानंतर दोघांमध्ये वाद होण्यास सुरवात झाली. चारित्र्यावर संशय घेऊन पती आपला मानसिक छळ करत असल्याची तक्रार प्रतीक्षाने तिच्या आई-वडिलांकडे केली होती. तसेच माहेरून हुंड्याचे पैसे आणि फर्निचर साठी पैसे आणण्याचा पतीकडून तगादा लावला जात असल्याचा आरोप प्रतीक्षाने केला होता. दोघांमधील वादात कुटुंबियांनी मध्यस्थी सुद्धा केली होती तरी त्याच एकही उपयोग झाला नाही.
मृत्यूपूर्वी पतीला फोन करून बोलावले घरी पण..
या दरम्यान, शनिवारी प्रतीक्षा आणि तिच्या पतीमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. या वादानंतर तिचा पती बाहेर निघून गेला. यानंतर प्रतीक्षाने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. यात एक बाब म्हणजे महत्त्वाचं म्हणजे मृत्यूपूर्वी पतीला फोन करून घरी बोलावले. मात्र, तो येण्यापूर्वीच तिने गळफास घेतलेला होता. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.