बीड : लोकसभेमध्ये आम्ही दोघे बहिण-भाऊ एकत्र होतो. पकंजा मुंडे यांना परळी मतदारसंघातून 75 हजारांची लीड मिळाली म्हणून मी ही निवडणूक सहजपणे घेणार नाही. लढाई ही लढाई असते या लढाईमध्ये आपण संपूर्णपणे झोकून देऊन विजय प्राप्त करायचा असतो. कोणतीही निवडणूक असली तरी मी ती सहज घेत नाही. त्यामुळे मी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचा विश्वास मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आज पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच औक्षण केलं. तसेच विजयी होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
यावेळी बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, “महायुतीची यादी जवळपास जाहीर झालेली आहे. धनंजय मुंडे यांची बहिण म्हणून मी उपस्थित आहे. धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देते. ही निवडणूक त्यांना सोपी जावी. चांगल्या मतांनी त्यांना विजय मिळावा. या मतदारसंघामध्ये परंपरागत आमच्या परिवाराने सेवा केली आहे, तशी त्यांनी सुद्धा सेवा करत राहावी.