मुंबई: बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अनेक मुद्द्यांनी गाजलेली अवघ्या देशाने पाहिली. निवडणूक झाल्यानंतरही जिल्ह्यात तणावाचे वातावरण बघायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे बोलत होते. अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत झालेला पराभव आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला. विजयी उमेदवाराचे अभिनंदन सुद्धा करून झाले. परंतु अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व विविध नेत्यांचा अपमान करणाऱ्या पोस्ट केल्या जात असून याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपसातील द्वेष व तणाव वाढत आहे. त्यामुळे आपला सामाजिक सलोखा व सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीड जिल्हावासियाची आहे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज व्हीडिओ संदेशद्वारे केले आहे.
‘क्या हार मे, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै’ स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या या कवितेप्रमाणे मी व पंकजाताईंनी जिव्हारी लागणारा हा पराभव मान्य केला आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा असतो आणि तो कौल आपण मान्य करून विजयी उमेदवारास शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत.
मात्र, सोशल मीडियावर अजूनही आमच्यासारख्या नेत्यांचे फोटो आणि बनावट व्हिडिओ पोस्ट करून वातावरण दूषित केले जात आहे. अत्यंत खालच्या भाषेत राजकीय नेत्यांवर टीका करणाऱ्या पोस्ट तसेच जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, की हे आता थांबवायला हवं. असंही धनंजय मुंडे म्हणाले.
मी रिव्हॉल्वर काढल्याच्या बातम्या खोट्या : धनंजय मुंडे
मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने नियमानुसार मतमोजणी प्रक्रियेत किंवा मतमोजणी केंद्राच्या जवळपास सुद्धा उपस्थित नसताना मी बंदूक काढली किंवा कोणाला मारहाण केली अशा पद्धतीच्या खोट्या पोस्ट जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. या गोष्टीत अजिबात तथ्य नसून या गोष्टी पूर्णपणे खोट्या आणि जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या आहेत. अशा विकृत गोष्टी पेरल्याने काय साध्य होणार आहे, असा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला आहे