बुलढाणा: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मेहकर या होमटाऊनमध्ये आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या काही अंतरावर एका गर्भवती महिलेची घराबाहेर रस्त्यावर अर्धवट प्रसूती झाल्याचा प्रकार घडला. यावेळी मदतीसाठी गेलेल्या नागरिकांना रुग्णालयातील परिचारिकेने महिलेचा रुग्णालयात घेऊन येण्यास सांगितल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर तिचा पती ऑटोरिक्षा आणण्यासाठी बाहेर गेला होता. त्यामुळे महिला घरात एकटीच होती. वेदना असह्य झाल्याने ती घराबाहेर रस्त्यावर आली. याचदरम्यान तिची अर्धवट प्रसूती झाली. महिलेच्या विव्हळण्याचा आवाज ऐकून शेजारी योगेश सौभागे यांनी पत्नीसमवेत तिच्याकडे धाव घेतली.

परिस्थिती पाहून योगेश तातडीने जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात मदतीसाठी गेले. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या परिचारिकेने स्वतः घटनास्थळी येण्यास नकार देत महिलेला रुग्णालयात घेऊन येण्यास सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर योगेश यांनी वेळ न दवडता दुचाकीवरून एका खासगी रुग्णालयात धाव घेतली.

खासगी रुग्णालयातील परिचारिका बेबी अग्रवाल यांना त्यांनी घटनास्थळी नेले. त्यांनी तातडीने परिस्थिती हाताळत महिलेची सुखरूप प्रसूती करून घेतली आणि महिला व नवजात बाळाला रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या समयसूचकतेमुळे दोघांचेही प्राण वाचल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर मेहकर ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनेच्या वेळी रुग्णालयात एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता हिवसे या काही दिवसांपासून रुग्णालयात उपस्थित नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकाराची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली आहे. तर माजी आमदार संजय रायमुलकर यांनीही दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, घटनेच्या वेळी गैरहजर असलेल्या डॉक्टरांवर गंभीर कारवाई करावी, अशी भूमिका मांडली आहे. या घटनेमुळे मेहकरमधील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







