बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये पोलिसांनी वाल्मिक कराडला वगळता उर्वरित आठ आरोपींवर मोक्का कायद्यातंर्गत कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. वाल्मिक कराडवर मोक्का न लावल्यामुळे संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी गावातील उंच टाकीवर चढून आंदोलन सुरु केले आहे. वाल्मिक कराडवर अजूनही मोक्काअंतर्गत कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न करत धनंजय देशमुख यांनी सरकारला विचारणा केली आहे.
यामुळे जिल्ह्यातील मस्साजोग गावात ग्रामस्थ आणि गावातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. संतोष देशमुखांचे बंधु धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरु केले आहे. यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील मस्साजोगमध्ये आले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख यांना फोनवर करून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना टाकीवरून खाली येण्याची विनंती केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे,धनंजय देशमुख यांना फोनवर बोलताना म्हणाले, ‘तुम्हाला काही झाले तर मी यांना सोडणार नाही’. तुमच्या कुटुंबाला आधाराची गरज आहे. कृपया खाली या. तुमची आम्हाला गरज आहे. तुम्ही कृपया खाली या. तुम्ही खचुन जाण्याचं काहीही कारण नाही. हा संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. संतोष भैय्याला न्याय द्यायचा आहे. मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही ‘प्लीज खाली या’, असे फोनवरून मनोज जरांगे यांनी म्हटले.
संतोष देशमुख आंदोलनावर ठाम
यावेळी संतोष देशमुख यांच्याशी फोनवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांचे डोळेभरून आल्याचे दिसून आले. तर यावेळी धनंजय देशमुख यांच्या देखील डोळ्यात पाणी आले होते. मात्र धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेण्याचा मानस नसल्याचे दिसून येत आहे. ते अजूनही पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलवर संतोष देशमुख ठाम आहेत. अतिरिक्त पोलीस जिल्हा अधीक्षक तिडके पाण्याच्या टाकीवर धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करण्यासाठी जात आहेत.
वाल्मीक कराडला मोक्का अंतर्गत टाकावे; देशमुख कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
याबाबत माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आरोपी खंडणीतील असो किंवा धनंजय मुंडे यांच्या टोळीतील मी कोणालाही सोडणार नाही. माझे काळीज पातळ आहे तिकडे धनंजय देशमुख आत्महत्या करणार म्हटले आणि माझे अंग थरथर कापायला लागले आहे.
जरांगे म्हणाले कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो. खरे तर मुख्यमंत्री अशा वेळी कुटुंबाकडे येत असतात. मुख्यमंत्र्यांना देशमुख कुटुंबीयाने सांगितलं की, खंडणी आणि खुनातील आरोपी एकच आहेत. त्यांच्यावर मोक्का लावून त्यांना 302 मध्ये टाकावे. देशमुख कुटुंबाने मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मराठ्यांनी देखील विश्वास ठेवला आहे. राज्यात मराठा समाज अजून मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर शांत आहे. परंतु, आत्महत्या करण्याची वेळ जर देशमुख कुटुंबीयांवर येणार असेल, तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.