लातूर : लातूरमध्ये दहिहंडी फोडताना जखमी झालेल्या आणखी एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अहमदपूर येथे काल रात्री दहीहंडी फोडण्यासाठी रचलेला थर कोसळून जखमी झालेल्या गोविंदाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 17 वर्षीय तरण्याबांड मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उदय महेश कसबे असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात काल रात्री दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी योद्धा प्रतिष्ठान मार्फत दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. जिल्हाभरातून अनेक संघ यामध्ये सहभाग घेत असतात. दरम्यान, अहमदपूर येथील काल झालेल्या स्पर्धेत साठे नगर भागातील एका गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता. यात उदय महेश कसबे हा सतरा वर्षाचा नवतरुण मुलगा सहभागी झाला होता.
शेवटच्या थरावर तो गेला आणि तोल ढासळून खाली पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याच्यावर अहमदपूर येथे रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मध्यरात्री पोटात दुखत असल्याने त्याला लातूर येथे दाखल केली होते. मात्र उपचारादरम्यान आज त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच उदय याचा मित्र परिवार आणि नातेवाईक यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली. त्यांनी आयोजकांवर गुन्हा दखल करण्याची मागणी केली आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली असून मृतदेह अहमदपूर येथे पाठण्यात आला आहे.
महेश कसबे यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. त्यांना दोन मुले व एक मुलगी असे अपत्य आहेत. उदय कसबे हा त्यांचा मोठा मुलगा होता. तो बेकरीवर काम करत होता. त्याच्या आकस्मित मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आधार गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.