छत्रपती संभाजीनगर: सायबर भामटे वेगवेगळी आमिषे दाखवून लोकांना ऑनलाईन गंडा घालतात. मात्र, ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास करून सायबर भामट्यांचे खाते शोधले आणि त्यांच्या तावडीतून सुमारे ५ लाख ६२ हजार ४०० रुपये परत मिळविले. सायबर भामटा शेर असेल, तर ग्रामीण सायबर पोलीसही सव्वाशेर असल्याचे त्यांनी दाखवून दिले.
पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलंब्री येथील अण्णा भगवान मोटे (२५, रा. बोधेगाव, ता. फुलंब्री) याचे टेलिग्रामवर खाते आहे. त्याला २५ जून रोजी टेलीग्रामवर सायबर भामट्याने काही तासात पैसे दुप्पट करा, अशी जाहिरात पाठविली. त्या जाहिरातीला मोटे बळी पडला. भामट्याने त्याला वेगवेगळे टास्क देऊन रिवॉर्ड देण्याचे आमिष दाखविले. मोटे याच्याकडून टप्याटप्याने ५ लाख ६२ हजार ४०० रुपये उकळले. मात्र, नंतर भामट्याने संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोटे याने ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजित ताईतवाले, मुकेश वाघ, गणेश घोरपडे आणि शीतल खंडागळे यांनी तांत्रिक तपास केला.
‘त्या’ खात्यात ९ जणांचे पैसे
ग्रामीण सायबर पोलिसांनी फ्रिज केलेल्या कोटक महिंद्रा बँकेतील खात्यात आण्णा मोटे याच्याप्रमाणेच देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या ९ जणांचे पैसे अडकलेले होते. यावरून हे खाते सायबर भामटे केवळ फसवणुकीचे पैसे ठेवण्यासाठीच वापरत असल्याचे समोर आले. शनिवारी (दि. ३०) सर्व कायदेशीर प्रक्रिया करून मोटेला त्याचे पैसे परत करण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली.