बीड : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात काल ( 25 ऑगस्ट) ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादामुळे जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कता दाखवत संपूर्ण बीड जिल्ह्यात पुढील 15 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जाहीर केले. या कालावधीदरम्यान कोणतेही आंदोलन, निदर्शने, मोर्चे अथवा पाचपेक्षा अधिक जणांचा जमाव एकत्र येण्यावर बंदी असेल. कोणत्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य केल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, गेवराई शहरात काल उशिरा घडलेल्या राडा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दोन्ही गटांतील समर्थकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
आमदार विजयसिंह पंडित यांनी यावर प्रतिक्रिया देताना हाके यांच्यावर टीका केली. “लक्ष्मण हाके समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी माझ्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले. आमच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया ही त्याच चिथावणीखोर भाषेवर होती,” असे त्यांनी स्पष्ट केले. “जरांगे यांना समर्थन दिल्याने समाजात तेढ निर्माण होते, हे चुकीचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
गेवराईतील राड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू केली असून, आगामी काळात मराठा-ओबीसी आंदोलकांतील तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.







