बीड: बीड शहरात मानवी हक्क आणि (Crime News) वैयक्तिक स्वातंत्र्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोणतेही व्यसन नसताना एका (Beed News) ग्रामसेवकाला त्यांच्याच पत्नीने संगनमत करून थेट खासगी व्यसनमुक्ती केंद्रात डांबून ठेवल्याचा आरोप समोर आला आहे. मालमत्ता हडप करण्यासाठी आणि आर्थिक वादातून हा पूर्वनियोजित कट रचल्याचा दावा पीडित पतीने केला असून, न्यायासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली आहे. (Latest Marathi News)

पीडित ग्रामसेवक घरी असताना चार अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आल्या. “शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बोलावले आहे,” असे सांगून त्यांनी जबरदस्तीने त्यांना गाडीत बसवले. मात्र, पोलीस ठाण्याऐवजी त्यांना थेट एका खासगी व्यसनमुक्ती केंद्रात नेऊन तिसऱ्या मजल्यावर कोंडून ठेवण्यात आले.
दरम्यान, ग्रामसेवक घरी न परतल्याने त्यांच्या भावांनी शोध सुरू केला. पत्नीने ते प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेल्याचे सांगून सर्वांची दिशाभूल केली. मात्र, काही दिवसांतच सत्य समोर आले. “पगार खाते संयुक्त करा आणि घर माझ्या नावावर करा, तरच केंद्रातून सोडवेन,” अशी अट पत्नीने पतीसमोर ठेवल्याचा आरोप पीडिताने केला आहे. यावरून हा प्रकार पूर्णपणे नियोजित कट असल्याचे स्पष्ट होत आहे.
अखेर भावांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे धाव घेतली. प्राधिकरणाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे ग्रामसेवकाची सुटका करण्यात आली. मात्र, सुटकेपूर्वी केंद्राने त्यांच्याकडून जबरदस्तीने 16,400 रुपये फी वसूल केल्याचाही आरोप आहे.
या घटनेमुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे, केंद्राचे संचालक तेजस घुमरे यांनी आरोप फेटाळून लावत पत्नीने शपथपत्र आणि पुरावे दिल्यानंतरच प्रवेश दिल्याचा दावा केला आहे.
हा प्रकार केवळ कौटुंबिक वादापुरता मर्यादित नसून, नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर घाला घालणारा गंभीर मुद्दा बनला आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







