छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून (Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉस्टेलमध्ये एकत्र राहणाऱ्या जिवलग मैत्रिणीनेच विश्वासघात करत (Chhatrapati Sambhajinagar) मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढून ते आपल्या प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिडको एन-8 परिसरातील या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पीडित तरुणी आणि आरोपी समृद्धी जगदाळे या दोघीही एका हॉस्टेलमध्ये रुममेट म्हणून राहत होत्या. 18 जानेवारी रोजी पीडित तरुणी कपडे बदलत असताना समृद्धीने संधी साधून मोबाईलमध्ये तिचे खासगी फोटो आणि व्हिडीओ चित्रीत केले. हे व्हिडीओ तिने तात्काळ आपल्या बॉयफ्रेंड स्वराज धालगडे याला पाठवले. काही दिवसांनी हा प्रकार लक्षात येताच पीडित तरुणीने समृद्धीकडे जाब विचारला. मात्र माफी मागण्याऐवजी आरोपी तरुणीने वाद घातला आणि परिस्थिती आणखी गंभीर झाली.
तक्रारीनुसार, समृद्धीने स्वराज धालगडे याला घटनास्थळी बोलावून पीडित तरुणीला मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, कुणाला काही सांगितल्यास आत्महत्येची चिठ्ठी लिहून दोष तिच्यावर टाकण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. मानसिक दहशतीत असतानाही तरुणीने धैर्य दाखवत सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन समृद्धी जगदाळे आणि स्वराज धालगडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा आणि व्हिडीओंचा मागोवा घेतला जात आहे.







