Crime News : बीड : बीड जिल्ह्यातील रायमोहा परिसरात मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने पैशांच्या वादातून आपल्या जिवलग मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे आरोपीचा दुसऱ्याच दिवशी विवाह ठरलेला असताना, लग्नाच्या आदल्या रात्री ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
रायमोहा तालुक्यातील डोंगरदेवी दगडवाडी शिवारात 30 वर्षीय चांद उर्फ गुड्डू तांबोळी याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा होत्या. प्राथमिक तपासात दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला गती दिली.

तपासादरम्यान ही हत्या चांदचा मित्र अतिक तांबोळी याने केल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदने अतिकला दीड लाख रुपये उसनवारीने दिले होते. हे पैसे परत मिळावेत, यासाठी तो सातत्याने तगादा लावत होता. मात्र अतिक पैसे परत देण्यास टाळाटाळ करत होता. सोमवारी अतिकचा विवाह ठरलेला असल्याने, पैसे न दिल्यास लग्नात येऊन गोंधळ घालण्याची धमकी चांदने दिल्याचे सांगितले जाते.
लग्नाच्या दिवशी बदनामी होईल या भीतीने अतिक अस्वस्थ झाला होता. याच रागातून रविवारी रात्री त्याने चांदला डोंगरदेवी दगडवाडी शिवारात बोलावले. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या अतिकने दगडाने ठेचून चांदची निर्घृण हत्या केली.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीनुसार मध्यरात्री बीड शहरातून त्याला ताब्यात घेतले. लग्नाला काही तास उरले असतानाच नवरदेव अटक झाल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






