धाराशिव : तुळजाभवानी मंदिरातून 8 कोटी 43 लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. या घोटाळाप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. 1991 ते 2009 दरम्यान भक्तांनी देवीच्या चरणी धन अर्पण केले. पण दानात मोठा भ्रष्टाचार झाला अशी तक्रार करण्यात आली.
या दानात मोठा घोटाळा झाल्याची बाब तत्कालीन जिल्हाधिका-यांच्या लक्षात आली आणि त्यांनी चौकशीचे निर्देश दिले. आता कोर्टाने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी दिली आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण मागील ब-याच वर्षांपासून चर्चेत होते. यासंबंधी सीआयडी चौकशीही करण्यात आली होती. दरम्यान, यासंदर्भात हिंदू जनजागृती समितीने ज्येष्ठ विधिज्ञ संजीव देशपांडे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेनुसार तुळजा भवानी मंदिर संस्थानमध्ये 1991 ते 2009 या कालावधीत भ्रष्टाचार झाल्याच्या संदर्भाने एक याचिका दाखल केली होती.
सुनावणीवेळी संबंधित प्रकरणात चौकशीनंचर सीआयडीने 27 ऑक्टोबर 2017 रोजी शासनाला 8.43 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अहवाल सोपवला आहे. संबंधित अहवाल हा सांख्यिकी अधिकारी व लेखापरिक्षणाच्या आधारे असल्याचे नमूद असल्याचे खंडपीठापुढे सांगण्यात आले.