छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यावर्षी एकीकडे तीव्र ऊन तापत असताना मध्ये उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येत आहे. मागील दोन आठवड्यांपूर्वी वादळी वाऱ्यासह अनेक भागात पाऊस झाला. असेच वातावरण आता पुढील आठ दिवस राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्यात गत दीड महिन्यात वातावरणात बदल होत आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही दिवस ढगाळ वातावरण राहिले. मात्र, ३० तारखेनंतर आकाश शुभ्र होऊन तापमानात अचानक मोठी वाढ झाली. सध्या जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंशांवर जात आहे.