Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संभाजीनगरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे पुन्हा एकदा महानगरपालिकेविरोधात नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळतोय. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 12 महिने संघर्ष करावा लागतोच, मात्र नवीन वर्षाची सुरूवातच अशी झाल्याने नागरिक संतापले आहेत.
जायकवाडी ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत येणारी 700 मिमी व्यासाच्या जलवाहिनीला पाच ठिकाणी गळती लागली आहे. हे लक्षात आल्यावर दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. तब्बल दहा तास दुरुस्तीचे काम चालणार आहे. पाणीपुरवठ्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
ढोरकीन पंप हाऊस, ढोरकीन प्राथमिक आरोग्य केंद्र, ढाकेफळ फाटा, फरशीनाला आणि नक्षत्रवाडी पंप हाऊस या पाच ठिकाणी मोठे लिकेज झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. या सर्व लिकेजची दुरुस्ती करण्यासाठी 700 मिमी व्यासाची जलवाहिनी 10 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती संबंधित विभागातर्फे देण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे 700 मिमी व्यासाची जलवाहिनी पूर्णपणे कालबाह्य झाली आहे. 1974 मध्ये टाकण्यात आलेल्या या जलवाहिनीला तब्बल 49 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे ही जलवाहिनी सतत फुटत असते. परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असतो.