छत्रपती संभाजीनगर : खाकी वर्दीतही माणुसकी अजून जीवंत आहे, याचा प्रत्यय आणणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून घरातून निघून आत्महत्या करण्यास गेलेल्या व्यक्तीस पोलिसांनी प्रयत्न करून आत्महत्येपासून परावृत्त केले आहे.
दीपक सदाशिव बोराडे (वय ४२ रा. गट नंबर सहा, जीवननगर वडगाव कोल्हाटी) हा इसम सोमवारी दुपारी कौटुंबिक वादातून घरातून निघून गेला होता. मी आत्महत्या करण्यास रेल्वे स्टेशन येथे चाललो आहे, असे त्याने मुलीला फोनद्वारे कळविले होते. त्यावरुन त्यांची मुलगी व इतर नातेवाईक तातडीने वेदांतनगर ठाण्यात धावले. पोलिसांना हकीकत सांगताच त्यांनी एक टीम त्वरीत रेल्वे स्टेशनकडे पाठवली. सोबतच दीपकचा फोन नंबर घेत त्याचे लोकेशन प्राप्त केले.
त्यानुसार तो शरणापूर फाटा येथे रेल्वे रुळाजवळ असल्याचे लक्षात आले. यानंतर तात्काळ पोलीस अंमलदार आणि त्यांचे नातेवाईक सदर ठिकाणी पोहोचले. शरणापुर फाटा रेल्वे रुळाजवळ शोधाशोध करत त्यांनी दीपक बोराडेचा तपास केला. त्याला ३.५५ वाजता ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्याचे समुपदेशन करून त्याला आत्महत्येपसून परावृत्त करत मुलगी व नातेवाइकासोबत घरी पाठवून दिले.