छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अशातच देवीच्या मुर्तीचे विसर्जन करताना पूर्णा नदीत बाप लेक बुडाल्याची दुर्देवी घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
सांडू नामदेव सागरे (वय- 45) आणि निवृत्ती सांडू सागरे (वय-28) रा. बेलेश्वरवाडी (केऱ्हाळा)अ से नदीत बुडालेल्या बापलेकाची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोडच्या वांजोळा परिसरात ही घटना घडली आहे. देवीचे विसर्जन करण्यासाठी हे बाप लेक पूर्णा नदीपात्रामध्ये गेले होते, त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन्ही पथकांनी नदीपात्रात शोध मोहीम सुरु केली मात्र अद्यापही या बाप लेकाचे मृतदेह या पथकाच्या हाती लागले नसून अजुनही त्यांचा शोध सुरुच आहे.
दरम्यान, देवीचे विसर्जन करताना बापलेकासोबत त्यांचा 14 वर्षाचा मुलगा नदीकाठी उभा राहिल्यामुळे तो थोडक्यात बचावला. त्यानेच या घटनेबाबतची माहिती कळवली. सायंकाळी पाचच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले व त्यांनी शोध मोहीम हाती घेतली. दोन तास त्यांनी शोध घेतला. मात्र त्यांना यश आले नाही. अंधार पडल्याने सातच्या सुमारास शोध मोहीम थांबवण्यात आली. रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.