chhatrapati sambhajinagar: छत्रपतीसंभाजी नगर : सध्याच्या वातावरणात थंडीचा जोर वाढला आहे, आणि थंडी तिच्यासोबत विविध आजारांना घेऊन येते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या असंच चित्र छत्रपतीसंभाजी नगरात पहायला मिळत आहे. अनेकांना सर्दी, खोकलाचा आजार होत असल्याचे समोर आले आहे. पैठण शहरातील रुग्णालयात रुग्ण तपासणीसाठी येणारी संख्या वाढली आहे. रात्रीच्या वेळी व पहाटेपासून सकाळी 10 वाजेपर्यंत थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला दिसतो. लहान मुलांना तसेच वयस्कर नागरिकांना जास्त त्रास होत असल्याचे चित्र शहरात आहे.
दरम्यान, थंडीत लहान मुलांना सर्दी कफ होतो. अनेकांना ताप, खोकला, यासारखी लक्षणे दिसत आहे. ताप सर्दीमुळे अन्न न जाणे, चिडचिड होणे, अशा अनेक समस्या उद्भवत असून थंडीमुळे लहान मुले व नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच रुग्णालयात सर्दी, खोकला, तापीचे रुग्ण जास्त येत आहेत. दररोज येथील सरकारी व खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे.
सुरुवातीला काही दिवस थंडी नव्हती. मात्र, आता दिवसेंदिवस थंडी वाढत असल्याने घरात गुंडाळून ठेवलेले स्वेटर, मफलर, टोपी, ब्लँकेट, शाल नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी बाहेर काढले आहेत. तर ज्यांच्याकडे उपलब्ध नाही ते नागरिक शहरातील दुकानांत खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.