Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यात बसच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू झाला, त्यावर संतप्त जमावाने बसची तोडफोड करत ती पेटवल्याची धक्कादायक घटना घडली. या जाळपोळीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. शाहरुख पठाण (वय 4 वर्षे) असे मृत मुलाचे नाव आहे. तर, चिमुकल्याची आई देखील गंभीर जखमी झाली आहे.
आईसोबत चॉकलेट आणण्यासाठी गेला
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चितेगाव येथील पांगरा रोडवर चार वर्षांचा शाहरुख आईसोबत चॉकलेट आणण्यासाठी गेला होता. याचवेळी तिथून जाणाऱ्या एका शाळेच्या बसने आई आणि मुलाला जोराची धडक दिली. ज्यात आई गंभीर जखमी झाली. मात्र, शाहरुख पठाण बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तात्काळ अपघातग्रस्त आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुलाला डॉक्टरांनी मुलाला मयत घोषित केले.
वाहनाची तोडफोड करत पेटवले
मुलाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी शाळेची बसची तोडफोड केली. बसच्या संपूर्ण काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर काही अज्ञात लोकांनी बस पेटवून दिली. ज्यात बस अक्षरशः जळून खाक झाली आहे. मुख्य रोडवर बस जळत असल्याने नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशामक दलाकडून आग विजवण्यात आली. मात्र, तोपर्यंत बस जळून खाक झाली होती.