अंबड (जालना) : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर तुफान हल्ला केला आहे. “कोणाचं खाता कोणाचं खाता? असं सारखं म्हणतो, पण तुझे खातो काय रे ?” असं म्हणते छगन भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. मी तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते आधी समजून घे म्हणत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे की, या दगडाला शेंदूर लावून तुम्हाला कोणता देव करायचा आहे? याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असं देखील भुजबळ म्हणाले. जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकर आदी नेते उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळांनी जालन्यातील लाठीचार्जवरुन गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावेळी 70 पोलिसांवर हल्ले झाले. त्यानंतरच पोलिसांनी त्या लोकांवर लाठीचार्ज केला. पण संबंध महाराष्ट्रासमोर चुकीचं चित्र गेलं. गृहमंत्रीच माफी मागू लागले, गुन्हे मागे घेऊ म्हणू लागले, त्यामुळे पोलिसांचं मनोबल खचलं, असं छगन भुजबळ म्हणाले. तसंच ओबीसींचे बोर्ड फाडणाऱ्यांना लोकांना जशास तसं उत्तर देण्याचा आदेश भुजबळांनी दिला.
राजेश टोपे-रोहित पवारांनी जरांगेंना आणून बसवलं
लाठीचार्ज झाल्यावर हे सरदार (मनोज जरांगे पाटील) घरात जाऊन बसले. माजी मंत्री राजेश टोपे आणि आमदार रोहित पवार यांनी जरांगे पाटील यांना पहाटे तीन वाजता परत आणून बसवले. त्यांना सांगितलं, शरद पवार येणार आहेत. शरद पवारांना लाठीचार्ज का झाला, पोलिसांवर हल्ले कसे झाले हे मात्र सांगितलं नाही, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.