Chandrapur Tiger Death : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा वाघांचा मृत्यू झालाय. त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 5 दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात विविध कारणांमुळे तब्बल 3 वाघांचा मृत्यू झालाय. आज सकाळी सावली तालुक्यातल्या सामदा गावाजवळ एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. गोसेखुर्द कालव्याच्या बाजूला असलेल्या शेतात हा मृत वाघ आढळला. पाच दिवसांतली ही सलग तिसरी घटना घडल्याने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
24 डिसेंबरलांच शिकारीच्या शोधात असतांना विहीरीत पडून एका वाघाचा मृत्यू झाला होता. नागभीड तालुक्यातील गोविंदपूर शेत शिवारातील ही घटना घडली. मृत वाघ नर असून अंदाजे दीड वर्ष त्याचं वय आहे. धक्कादायक म्हणजे या गावाला सरकारकडून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी 25 लाखांचं अनुदान मिळालं आहे. मात्र सरकार कडून अनुदान मिळून देखील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विहिरींना कठडे बांधण्यात आलेले नाही. सरकार कडून मिळालेल्या निधीच्या चौकशीची वन्यजीव प्रेमींनी मागणी केली आहे. सलग तीन वाघांच्या मृत्यूने वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
वनविभागाकडून घटनेचा तपास सुरू
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र असं असतांनाच वाघांच्या अपघाती मृत्यूंमध्ये देखील वाढ झाली आहे, ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे वाघांच्या अपघाती मृत्यूंच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वाघांच्या संरक्षणाचा मुद्दा ‘राम भरोसे’ तर नाही ना, असा सवाल या निमित्याने उपस्थित केला जातोय.