छत्रपती संभाजीनगर : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता परिस्थिती नियंत्रणात आली असून संपूर्ण शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रामगिरी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली रामगिरी महाराजांची भेट..
रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच रामगिरी महाराजांची भेट मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांची सिन्नरमध्ये जाऊन भेट घेतली. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांचा उल्लेख संत असा केला आहे. तसेच, भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी रामगिरी महाराजांना वाकून नमस्कार केला. तर सुजय विखे पाटील यांनी रामगिरी महाराजांसमोर साष्टांग दंडवत घातलं आहे. यामुळे वाद वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘या’ शहरात तणावपूर्ण शांतता..
वैजापूर शहरात 15 ऑगस्टला रात्री तणाव निर्माण झाला. विशिष्ट समाजाचा मोठा जमाव अचानक डॉ. आंबेडकर चौकात जमून त्यांनी घोषणाबाजी दयायला सुरू केली. रात्री आठपासूनच या जमावानं चौकात शड्डू ठोकला होता. या वेळी जमलेल्या जमावानं कारवाईची मागणी केली आहे. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढत कायदेशीर कारवाईचं आश्वासन दिल्यानं तणाव मिटला आहे. सध्या शहरात तणावपूर्व शांतता आहे.