छत्रपती संभाजीनगर : जयंत पाटील भाजपबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी मोठा आहे. भाजपबरोबर जाण्याचा जयंत पाटील यांनीच प्रस्ताव दिला होता. याबाबत चर्चा झाली होती, आपण सर्व मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे बैठकीमध्ये ठरलं होतं. असही शिरसाट म्हणाले, छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, आजही जयंत पाटील फक्त शरीराने शरद पवार यांचाकडे आहेत, मनाने अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे आमच्या माहितीप्रमाणे जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता, असे शिरसाट म्हणाले आहेत. तसेच, त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आले नसतील. पण ते येतील आणि त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून केलेल्या आरोपाला उत्तर देतांना शिरसाट म्हणाले की, राम मंदिर हा भाजपचा कार्यक्रम नाही. राम मंदिर उभारणीसाठी प्रत्येक भारतीयांचा हात लागलेला आहे. हा एक आनंदाचा क्षण असून, त्यात मिठाचा खडा कोणी टाकु नये, असे शिरसाट म्हणाले.
पुढे बोलताना म्हणले, पाणबुडीचा उद्योग गुजरातला गेल्याची बातमी आली असली तरीही याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. परंतु, महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांची चर्चा होतांना दिसत नाही. मागे असेच हिऱ्याचा उद्योग गुजरातला गेला असल्याचं सांगितलं गेलं. पण, पाणबुडीचा प्रकल्प राज्यबाहेर जाऊ देणार नाही. यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रात अनेक उद्योजक येण्यासाठी इच्छुक असतात, त्यासाठी पाऊल टाकण्याचे काम या सरकारने केलेल आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.