सिल्लोड : सिसारखेडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतामध्ये मुगाच्या शेंगा तोडत होत्या. त्यावेळी ढगांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असतांना अंगावर वीज कोसळून दोघी मायलेकींचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना १८ ऑगस्ट रोजी सिसारखेडा येथे सायंकाळच्या ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रेणूका हरिदास राऊत (वय-38 रा. सिसारखेडा ) आणि त्यांची मुलगी स्वाती हरिदास राऊत (वय-18) असे वीज पडून मृत्यू झालेल्या मायलेकींचे नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सिसारखेडा परिसरातील शेतामध्ये दोघीजणी मुगाच्या शेंगा तोडत होत्या. त्यावेळी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढगांच्या कडकडाटासह पाऊस सुरु असताना वीज कोसळून या दोघी मायलेकींचा जागेवरच मृत्यू झाला आहे. शेतीवर कुटुंबाचा गाडा हाकत असलेल्या या परिवारातील दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पाठीमागे पती हरिदास राऊत आणि मुलगा अंकुश राऊत असा परिवार आहे.
दरम्यान, या घटनेनंतर दोघींचा मृतदेह सिल्लोड येथिल शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन सोमवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात येणार आहे. अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक उमेश विसपुते यांनी दिली आहे. वीज कोसळून झालेल्या मायलेकींच्या मृत्यूचा अहवाल हा तहसिल प्रशासनाकडे मंडळाधिकारी शंकर जैस्वाल यांनी कळविला आहे. या घटनेनंतर राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली आहे .