बीड : बीड आणि बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानात पैशांचा गैरवापर आणि काही व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला होता. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी बीड आणि बारामतीत बोगस मतदान झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे कडक कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. ते एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, बीड, पुणे, बारामती लोकसभा मतदारसंघ सोडले तर बाकी सर्व ठिकाणी मतदान शांततेत पार पडले आहे. महाराष्ट्र राज्यात कधीच पैशाचा वापर झाला नाही. यावर्षी मोठया प्रमाणात पैशांचा वापर झाला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात रात्री दोन वाजता एक बँक उघडी होती. त्या बँकेतून पैसे वाटप केले जात होते. असे कधीच झाले नाही, मात्र या लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी अशा गोष्टी पाहिल्या मिळाल्या, असं पवार म्हणाले.
बीड आणि बारामती लोकसभा मतदार संघामध्ये बोगस मतदान झाले आहे. बीडमध्ये बूथ कॅप्चर करण्याचा प्रकार समोर आला आहे. बोगस मतदान करणे, लोकांना मतदान करू न देणे असे प्रकार देखील घडले आहेत. यामागे जो आहे त्याच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे हा माझा आग्रह आहे, असे देखील शरद पवार यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, निवडणूक आयोग सध्या असे काही निर्णय घेत आहेत, की त्यामुळे अडचण होत आहे. आमचा पक्ष काढून घेतला, आमचे चिन्ह काढून घेतले आणि त्यामुळे आम्हाला कोर्टात जावे लागले. मात्र, आम्ही यंदाच्या निवडणुकीत सामंजस्याची भूमिका घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आम्ही स्वतः ४८ पैकी १० जागा लढवत आहोत. आमच्या या भूमिकेमुळे आम्हाला फायदा होताना दिसत आहे.