अंबड : तालुक्यातील गोंदी (जि. जालना) जिल्हा परिषद शाळेत जादूटोण्यासारखा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. शनिवारी इयत्ता नववीचे विद्यार्थी प्रार्थनेनंतर वर्गात गेल्यावर त्यांना वर्गात काळी बाहुली, हळद-कुंकू बांगड्या तसेच वर्गातील भिंतीवर काढलेले बाहुलीचे चित्र व कुंकवाचे डाग आढळून आले. हे पाहताच विद्यार्थी घाबरुन वर्गाबाहेर पळाले. दरम्यान, या प्रकरणी मुख्याध्यापक सर्जेराव गडदे यांनी गोंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गोंदी जिल्हा परिषद शाळेत पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेच्या आवारात नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी शाळेत प्रार्थना झाली. त्यानंतर नववीचे विद्यार्थी वर्गात गेले. परंतु, वर्गातील फळ्याशेजारीच खिळ्याला अडकाविलेल्या बांगड्या, त्यावर वाहिलेले हळदी-कुंकू, खाली पडलेली बाहुली, लिंबू, भिंतीवर रेखाटलेले बाहुलेचे चित्र विद्यार्थ्यांना दिसले. त्यामुळे विद्यार्थी घाबरून वर्गाबाहेर पळाले. ग्रामसचिवालयाच्या इमारतीवरून उडी मारून शाळेच्या आवारात प्रवेश करत वर्ग खोलीची खिडकी तोडून वर्गात प्रवेश करत हा प्रकार केल्याची शक्यता आहे.
या प्रकारानंतर मुख्याध्यापक सर्जेराव गडदे यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. तसेच पालकांनीही शाळेत येऊन पाहणी केली. दरम्यान, हे कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान, मुख्याध्यापक गडदे यांनी रविवारी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी शाळेत प्रार्थना सुरू असताना विद्यार्थ्यांच्या अंगावर दगडफेक केल्याचा प्रकार या शाळेत घडला आहे.
चौकशी करून गुन्हा दाखल करणार: पोलीस
या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव गडदे व शालेय व्यवस्थापन समीतीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा सर्वोतोपरी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी दिली.