जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सगे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे.
त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असून त्यांना बोलताही येत नाही. तरी देखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सगे सोयरेची मागणी मान्य झाली, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभा केला आहे. अनेकवेळा मोठ-मोठी उपोषणे केली. तसेच त्यांनी मराठा बांधवांना सोबत घेऊन मुंबईच्या दिशेनं मोर्चा देखील काढला. मात्र जरांगे पाटील यांचा मोर्चा वाशीमध्येच असताना राज्य सरकारनं त्यांची सगे सोयरेची मागणी मान्य केली.
मागणी मान्य केल्यानं जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र अजूनही सगे सोयरेची अंमलबजावणी झाली नसल्यानं जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. उपोषण सुरु केल्यापासून त्यांनी अन्नाचा एक कणही आणि पाण्याचा थेंबही न घेतल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे.
नाकातून रक्तस्त्राव अन् बोलताही येईना
दरम्यान, डॉक्टरांचं एक पथक तातडीने अंतरवाली सराटी येथे दाखल झालं आहे. मात्र, जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत राज्य सरकार सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा आणि विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय देत नाही, तोपर्यंत मी माझे उपोषण माघार घेणार नाही, अशी कठोर भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यामुळे डॉक्टरही चिंतेत आहेत. नाकातून रक्त येणे ही गंभीर बाब असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.