मुंबई : अंतरवाली सराटीमध्ये सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी विना परवाना रास्ता रोको आंदोलन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, असे आवाहन करणाऱ्या जरांगे यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले आहेत.
मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार विविध ठिकाणी रास्ता रोको केल्याप्रकरणी मराठवाड्यातील तब्बल १,०४१ जणांवर तर बीड जिल्ह्यातल्या ४२५ जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. जरांगे यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील विविध ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर विना परवानगी रास्ता रोको करून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी जरांगे यांच्यासहित त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.
सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे-पाटील उपोषण बसले होते. त्यावेळी मंडपातून अचानक उठून मुंबईत फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर चालत चाललोय अशी घोषणा देत ते निघाले. परिणामी सभामंडपात गर्दी उसळली. मराठा समाजातील अनेक आंदोलक जरांगे-पाटील यांना त्यांच्या निर्णयावर फेरविचार करण्यास विनवत होते. रस्त्यावर महिलांसह मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी त्यांच्या सोबत चालण्यास सुरुवात केली. त्यामुळे जरांगे यांच्या गाडीसमोर मोठे अडथळे निर्माण झाले. सायंकाळपर्यंत हा ताफा भांबेरी (ता. अंबड) येथे पोहोचल्यावर तेथील नागरिकांनी जरांगे-पाटील यांना रात्रीचा मुक्काम करून औषधोपचार घेण्याची विनंती केली. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अक्षयकुमार बंन्सल भांबेरीत मुक्कामी थांबले.
दरम्यान, जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केले. सरकारने या आरोपांना प्रत्युत्तर देतानाच ‘आंदोलनकर्त्यांना कायदा हातात घेता येणार नाही. सरकारने संयम ठेवलेला आहे. संयमाचा अंत पाहू नका’, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. तर काहीही बोललेले खपवून घेणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरागेंना दिला. या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.