जालना : सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भूमिका घेत मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले. याबाबतचा निर्णय पुढील दोन तासांत घेणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे म्हणाले की, “आम्हाला न येण्याचा प्रयत्न केला जात आहे. रात्रीच संचारबंदीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मराठा समाजाने शांत राहिले पाहिजे. संचारबंदी लावली किंवा काहीही केले तरीही सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी करून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. मात्र, आंदोलकांनी पोलिसांना त्रास देऊ नये. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. हिंसक मार्गाला जाऊ नये.”
जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रात्री आमच्यासोबत साडेतीनशे गाड्या होत्या. आमच्यासोबत महिला होत्या. रात्रीच आमच्यावर हात उचलण्याचा डाव होता, पण आम्ही तो हाणून पाडला आहे. तसेच हे सर्व काही फडणवीस यांनी करायला लावल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.
अंबडमध्ये संचारबंदी कशासाठी?
“सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावीच लागेल. याचा परिणाम मराठ्यातच नाही, सगळ्या जाती-धर्मात होणार. आजच्या आज सग्या सोयऱ्याची अमलबजावणी करा. तुझ्याशिवाय कलेक्टर संचारबंदीचा आदेश काढू शकत नाही. विचार करुन पुढच पाऊल टाकणार. रात्रीचा डाव मोडला. आपण सगळ्यांना एकविचाराने कराव लागेल. महिलांवर रात्री हात उचलायला लावणार होता. अंबडमध्ये संचारबंदी लावण्याचे कारण काय?” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
फडणवीसांमध्ये दम नाही
भांबेरीत मराठा आंदोलक जमण्यास सुरुवात. “आम्हाला मुंबईकडे येऊ द्यायचे नाहीये. हा प्रयोग रात्रीच होणार होता. मराठ्यांनी डाव यशस्वी होऊ दिला नाही. थोड पुढे गेल्यावर होणार होता. म्हणून सकाळी निघण गरजेच होतं. कोणाकडे काहीच साहित्य नव्हतं. देवेंद्र फडणवीसमध्ये दम नाही. पोलिसांच्या आडून करतायत सगळं. फडणवीसांनी सोशल मीडियावर रात्री बंदुकीची फोटो टाकला” असा घणाघआत मनोज जरांगे पाटील यांनी केला.