बीड: जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यभरात ठिकठिकाणी मोठे आक्रोश मोर्चे निघाले. मराठवाड्यातील अनेक भागात मोर्चे, आंदोलने अजूनही सुरू आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींवर आता मकोका लावण्यात आलेला आहे. प्रकरणातील काही आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. अश्यातच पक्षाची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दादांनी संपूर्ण बीड जिल्हा पक्ष कार्यकारिणीच आता बरखास्त केल्याचे समोर आले आहे.
सरपंच हत्या प्रकणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बीड जिल्हातील संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. आरोपी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे निलंबित केल्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी कि, जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे हे जेल बंद आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली होती. यामुळे काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केज तालुक्यातील कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली आहे.
तटकरेंचे जिल्हा कार्यकारीणी बरखास्तीचे आदेश
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात विष्णू चाटे याचं नाव आल्यानंतर ही पक्ष कारवाई करण्यात आली आहे. आरोपी विष्णू चाटे हा केज तालुका अध्यक्ष होता. मात्र या गुन्ह्यात त्याचं नाव आल्यानंतर तातडीने निलंबित करण्यात आलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांची चौकशी झाली. त्यानंतर पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा महत्वाचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे.
चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका करण्याचे जिल्हाध्यक्षांना स्पष्ट आदेश
यानंतर जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहणार आहे. असं सुद्धा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलं आहे. इथूनपुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्यात असे स्पष्ट आदेश बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यातआले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत बिड जिल्ह्या पक्षाचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण,माजी आमदार संजय दौंड आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक झाली.या बैठकीत बीड जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीचा आढावा अजित पवार यांनी घेतला आहे.
जिल्ह्यातील आढावा घेतल्यानंतर पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीत अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीसाठी रवाना झाले होते. त्यामुळे आज धनंजय मुंडे परळी मध्ये काय भूमिका मांडणार हे पाहावे लागेल.