नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन भाजपशी हातमिळवणी केल्यावर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. नांदेडमधील भोकर विधानसभेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशोक चव्हाण हे स्वत: राज्यसभेवर जाणार असून, भोकर विधानसभेतून त्यांची कन्या श्रीजया चव्हाण मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे.
श्रीजया चव्हाण या गेल्या काही दिवसापासून अॅक्टिव्ह राजकारणात दिसत आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये आल्यावर श्रीजया चव्हाण त्यामध्ये हिरीरीने सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर नांदेडमध्ये श्रीजया चव्हाण भावी आमदार म्हणून बॅनर झळकले होते. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा राजकीय वारस आणि चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारण येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी हे भाजपमध्ये दाखल होताना काही अटी ठेवल्या होत्या. कन्या श्रीजया चव्हाण यांना विधानसभेचे तिकीट देणे ही त्यापैकी एक अट होती. त्यानुसार आता श्रीजया यांची भोकर विधानसभेतून उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे.
श्रीजया चव्हाण या अशोक चव्हाण यांच्या द्वितीय कन्या आहेत. श्रीजया चव्हाण यांनी एलएलबी पर्यंत शिक्षण घेतले आहे. श्रीजया यांचे बालपण आणि शिक्षण मुंबई येथे झाले आहे. त्या २०१९ मध्ये लोकसभेच्या प्रचारात उतरल्या. त्यांनी विधानसभेला भोकर मतदारसंघाचा सोशल मीडिया सांभाळला होता. भारत जोडो यात्रेत त्यांचे लाँचिंग झाले. मात्र, श्रीजया चव्हाण यांनी आजपर्यंत कोणतीही निवडणूक लढवलेली नाही.