धाराशिव : राज्यात विधानसभेच्या मतदानाला आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. प्रचारही अंतिम टप्प्यात आला आहे. दरम्यान, एका अपक्ष उमेदवाराच्या पत्रकानं निवडणूक अधिकाऱ्यांनाही आता टेन्शन घ्यायची वेळ आली आहे. आधी मोठी हौस म्हणून निवडणुकीचं चिन्ह घेतलं खरं, परंतु चप्पल निशाणी असल्यानं मतदानाच्या दिवशी बुथच्या २०० मी अंतरामध्ये कोणीही पायात चप्पल घातली, तर त्यांच्यावर आचारसंहिताभंगाची कारवाई करण्यात यावी, असं पत्रकच या अपक्ष उमेदवारानं काढलं आहे. सध्या या पत्रकाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार गुरुदास संभाजी कांबळे यांनी ‘आदर्श आचारसंहिते’चा भंग होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं आहे. चप्पल ही माझी निशाणी असल्यानं ती पायात घातल्यानं माझा प्रचार व प्रसार होऊ शकतो. त्यामुळं बुथपासून २०० मीटरच्या आत मतदानाच्या दिवशी जर कोणी चप्पल घालून आलं तर त्याच्यावर आचारसंहिता भंग केल्याबद्दल कडक कारवाई करण्यात यावी, असं या पत्रात या उमेदवारानं म्हटलं आहे. त्यामुळं आता परंड्यात मतदानाला येणाऱ्यांना अनवाणी पायानंच यावं लागणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
पत्रकामध्ये काय म्हटलंय?
‘मी गुरुदास संभाजी कांबळे अपक्ष उमेदवार अनुक्रमांक 12, निशाणी चप्पल, आपणास कळवू इच्छितो की, सध्या आदर्श आचारसंहिता लक्षात घेता नियमाप्रमाणे मतदान बूथपासून 200 मीटरच्या आत कोणत्याही उमेदवाराचे चिन्ह प्रकाशित किंवा प्रदर्शित करण्यास सक्त मनाई असल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारचा भंग होऊ नये म्हणून मी गुरुदास कांबळे आपणास लेखी अर्ज करतो की, माझी निशाणी चप्पल आहे, त्याचा प्रचार व प्रसार मतदान बूथपासून 200 मीटरच्या आत आचारसंहिता भंग होऊ नये याची मी स्वतः दखल घेत आहे.
त्याकरिता दिनांक 20/11/2024 रोजी मतदानाच्या दिवशी मतदान बूथच्या 200 मीटर अंतरामध्ये कोणतेही कर्मचारी पदाधिकारी उमेदवार व मतदार यांनी जर 200 मीटरच्या आत चप्पल घालून प्रवेश केल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. कारण चप्पल ही माझी निशाणी असल्यामुळे ती पायात घातल्याने माझा प्रचार व प्रसार हा लोकांनी पायात घालून प्रवेश केल्याने होऊ शकतो. त्यामुळे आचार सहिता भंग होणार याच्यात शंकाच नाही. असं या पत्रकामध्ये म्हटलं आहे.