जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, याबाबत मनोज जरांगे यांनी सावधगिरीची भूमिका घेतली आहे. खरा गुलाल हा कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर एकाला तरी त्या कायद्याअंतर्गत प्रमाणपत्र मिळाल्यावरच उधळणार, असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. सगे-सोयऱ्यांची अधिसूचना निघणे खूप महत्वाचे होते, असे राजपत्र क्वचितच निघते. याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. ते होईपर्यंत आपण सावध राहायचे असते, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या अध्यादेशाचा कायदा होऊन एकाला तरी त्या कायद्याअंतर्गत मराठा आरक्षणाचा फायदा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरु राहणार असल्याचेही जरांगे यांनी म्हटले आहे.
या आंदोलनाबाबत आपल्याला गाफील राहता येणार नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना या कायद्यचा लाभ झाला पाहिजे. नोंद मिळालेल्या सग्या सोयऱ्यांना सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या आधारे एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. ‘सगेसोयरे’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्या शब्दासाठी सरकारने १५ दिवस लावले. हे अध्यादेशाचे परिपत्रक आहे. त्यामुळे याबाबत गाफिल राहून चालणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे. जरांगे हे सोमवारी (ता. २९) रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ३१ जानेवारीला घरी जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सगेसोयऱ्यांसाठी आंदोलनाचा कायदा झाला आणि त्याचा फायदा कुणालाच झाला नाही तर, आंदोलन निष्फळ ठरेल. कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. जरांगे यांनी त्याचे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारसाठी अडचणी निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.