जालना : जालन्याच्या भोकरदन विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या तफ्यातील गाडीवर दगडफेक केली आहे. ही घटना भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथे बुधवारी रात्री घडली आहे.
भाजपा नेते रावसाहेब दानवे, महायुतीचे उमेदवार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप चंद्रकांत दानवे यांनी केला आहे. सुदैवाने या घटनेतून चंद्रकांत दानवे बचावले असले तरी ताफ्यातील मागील वाहनात बसलेले कॉंग्रेसचे दिवंगत माजी आमदार संतोषराव दसपुते यांचे चिरंजीव राजेंद्र दसपुते यांच्या डाव्या खांद्याला दगड लागून ते किरकोळ जखमी झाले आहेत.
दगडवाडी गावातून प्रचार करुन निघताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर शाळेच्या समोर अंधाराचा फायदा घेऊन काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.