बीड : मराठा आरक्षण आणि ओबोसी आरक्षण या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. यात अशातच मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी या मूळगावी दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. डीजे वाजवण्याच्या वादातून गावातील दोन गट आमनेसामने आल्याने तणाव वाढून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मातेरी गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा काल बीडमध्ये आली होती. रात्री गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा नियोजित दौरा हा भगवानगड येथे जाऊन भगवान बाबाचे दर्शन करण्याचा नियोजित कार्यक्रम होता.
त्यापूर्वी सायंकाळी जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातेरीमध्ये एका डीजेवर दगडफेक झाली आणि त्यानंतर तणाव निर्माण झाला. यावेळी रस्त्यावरील काही गाड्यावर दगडफेक करण्यात आली आहे. त्यानंतर मातोरी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये पोलीस दाखल झाले आहेत. मात्र, मातेरी शहराच्या दोन्ही बाजूला म्हणजे बीड आणि नगर या दोन्ही दिशेच्या बाजूने रात्रभर रास्तारोको करण्यात आला. यानंतर रात्रीपासून मातेरी गावात कायदा व सुव्यस्थेसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
लाठ्याकाठ्या हातात घेण्याचा काळ गेला : लक्ष्मण हाके
या घटनेनंतर ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दोन्ही समाजांना शांततेचे आवाहन केले आहे. लाठ्याकाठ्या हातात घेण्याचा काळ गेला, गावाची शांतता बिघडवू नका. आरक्षण मागणाऱ्या आणि आरक्षणाचं संरक्षण करणाऱ्या दोघांनी कायदा हातात घेऊ नये. शांत राहा, गावाची शांतता बिघडू नका, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले आहे. तसेच त्यांनी मातोरीच्या दगडफेकीच्या घटनेचा तीव्र निषेध केला.