बीड: नगरपालिका (Beed News) निवडणुकीत बीड जिल्ह्यातील गेवराई येथे माजी आमदार अमरसिंह पंडित आणि लक्ष्मण पवार यांच्या समर्थकांमध्ये मोठा संघर्ष झाला. गेवराई शहरात निवडणुकीच्या दिवशी पवार आणि पंडित कुटुंबातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, जखमी झालेल्या अमृत डावखर यांनी माध्यमांशी बोलताना माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबीयांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

पवार कुटुंबाने माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मतदान केंद्रावर झालेल्या किरकोळ बाचाबाचीमुळे हा वाद खूप वाढला होता.
डावखर यांनी सांगितले की, ज्यावेळी हा मारहाणीचा प्रसंग घडला, त्यावेळी ते गेवराईतील कार्यालयात होते. माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार यांच्यासह पाच-सहा गुंड प्रवृत्तीचे लोक तिथे आले. “ते अमरसिंह पंडितांना ‘संपवून टाकायचं’ म्हणत होते. पंडित तिथे नसल्याने त्यांनी मलाच संपवण्याचा प्रयत्न केला,” मला काठी, बेल्ट, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेवेळी ड्रायव्हर मध्ये आल्याने आपला जीव वाचला, असे त्यांनी सांगितले.






