छत्रपती संभाजीनगर : भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्ह्याची बदनामी होत असल्याची टीका राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांनी काल छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या या नाराजीवर टीका होऊ लागली.
बुलढाणा दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पंकजा मुंडे यांच्या विधानाबद्दल विचारले असता, कोणताही जिल्हा एका व्यक्तीमुळे नाही तर एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या कृतीमुळे बदनाम होत असतो. बीड जिल्हा वाल्मीक कराडच्या कृती आणि कामाच्या पद्धतीमुळे बदनाम होत आहे, असे अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.
परभणी आणि बीड येथील घटना या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या वतीने या दोन्ही प्रकरणी संसदेत आवाज उठवला. संदीप क्षीरसागर, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, नमिता मुंदडा, प्रकाश सोळंके यांनीही हा विषय विधिमंडळात मांडला आहे.
क्रूर आणि गलिच्छ अशा या दोन्ही घटनांमध्ये राजकारण आणू नये, माणुसकीच्या नात्याने या दोन्ही प्रकरणात आम्ही उभे आहोत. 33 दिवसानंतरही या दोन्ही घटना संदर्भात काही प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. मात्र त्याची उत्तरे मिळत नाहीत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. असेही सुळे यांनी म्हटले आहे.
..पण वाल्मीक कराडवर कारवाई नाही
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वाल्मीक कराडला ईडीची नोटीस पाठवण्यात आली पण त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. मकोका अंतर्गत कारवाई करण्यासही सरकार धजावत नाही. वाल्मीक कराडला अटक झाली पण त्याची अटक कशी झाली? तो शरण कसा आला? हे बघितले तर नुसती चेष्टा सुरू असल्याचे दिसून येते.
जोपर्यंत सरपंच संतोष देशमुख आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत माणुसकीच्या नात्याने आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. वाल्मीक कराड आणि त्याच्यासह जे कोणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दोषी असतील त्यांना फाशी झालीच पाहिजे. ज्या क्रूर पद्धतीने त्यांनी ही हत्या केली ते पाहता आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे, असा संतापही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.