धाराशिव : संतोष देशमुख हत्याप्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच बीडच्या प्रकरणाची पुनरावृत्ती वाटावी अशी घटना धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यात घडली आहे. तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या हल्यात ते थोडक्यात बचावले आहेत. मध्यरात्री एकच्या सुमारास बारुळ गावाजवळ ही घटना घडली. मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम मध्यरात्री गाडीने प्रवास करत होते. गाडीत त्यांचा भाऊ देखील होता. तेव्हा अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. दगडांनी काचा फोडून, गाडीत पेट्रोल टाकून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला गेला. या हल्ल्यामध्ये नामदेव निकम थोडक्यात बचावले. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव निकम बारुळ गावातून मेसाई जवळगा गावच्या दिशेने जात होते. त्यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूंनी दोन बाईक आल्या. बाईकवरचे लोक हॉर्न वाजवत होते. त्यांना पुढे जायचे आहे असं समजून नामदेव यांनी गाडीचा वेग कमी केला. लगेच त्या बाईकस्वारांनी डाव्या दरवाजाची काच दगडाने फोडली आणि पेट्रोलचे फुगे गाडीत टाकले.
‘आम्ही गाडीचा वेग वाढवला. तेव्हा बाईकवरच्या गुंडांनी आमच्या गाडीच्या समोरच्या काचेवर अंडी फेकली. अंड्यांमुळे काच खराब झाल्याने आम्हाला गाडीचा वेग कमी करावा लागला. त्यानंतर बाईक जवळ आणत गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला’, असा घटनाक्रम नामदेव यांनी सांगितला. तसेच पवनचक्कीच्या वादावरुन हा हल्ला झाल्याचा संशय असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.