बीड : लोकसभा निवडणुकीत राज्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बीड जिल्ह्यात प्रचारसभांचा जोरदार धडाका सुरू आहे. बीडमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात थेट सामना होत आहे. परंतु, मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याने बीडची लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून दिग्गज नेते सांगता सभेसाठी मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळीत पंकजा यांच्यासाठी सभा घेतली. या सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. सोनावणे यांच्या कारखान्यासाठी निधी देण्याचं काम मी केलं. तसेच कारखान्याची कपॅसिटी वाढवून दिली, असे अजित पवार म्हणाले होते. आता, बजरंग सोनवणेंनी अजित पवारांच्या टीकेला त्यांच्याच स्टाईलने प्रत्त्युत्तर दिलं आहे.
अजित दादांनी धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरुन मला कर्ज दिले, असे भाषणात सांगितले. मग, त्यांच्याच कारखान्याला अजितदादांनी का कर्ज दिलं नाही? असा प्रश्न सोनवणेंनी उपस्थित केला आहे. तसेच, माझ्या मुलीला पाडण्याचे काम मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनीच केल्याचही ते म्हणाले. तर, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित दादांना स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही. तुम्ही आमचं माप काढू नका, तुमचं माप बीड जिल्ह्यातील जनता काढल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत बजरंग सोनवणेंनी अजित पवार यांच्या पलटवार केला आहे.
दरम्यान परळीमधील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, पंकजाताईच्या विरोधात बजरंग उभा आहे. तो सारखा माझ्याकडे यायचा. माझ्या कारखान्याची कॅपसिटी वाढवून द्या, अशी मागणी सतत करत असायचा. मी देत नव्हतो पण धनंजय मुंडेंनी ती वाढवून देण्यासाठी सांगितले. त्यावेळी मी धनंजय मुंडे यांना सांगितले होते, की वेसन हातात ठेवायला पाहिजे होते. परंतु, धनुभाऊला कधी माणसं कळत नाही, म्हणून त्याची गाडी बिघडते, तू माझा सल्ला घेत जा, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटले होते. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेला पंचायत समितीमध्ये स्वत:ची मुलगी निवडून आणता आली नाही, अशी बोचरी टीकाही अजित पवार यांनी केली होती. त्यावर, आता बजरंग सोनवणेंनेही जोरदार पलटवार केला आहे.