छत्रपती संभाजीनगर : आत्मविश्वास नसल्याने भाजप फोडाफाडी करत आहेत. आणखी काही वर्षांनंतर भाजपचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेसमधून आलेला असेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक आयोगाने चोरांच्या हातात दिली. आता काँग्रेस देखील अशोक चव्हाण यांच्या हाती देणार की काय? अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा लपविण्यासाठी ते भाजपमध्ये गेले की काय, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. एकाने शिवसेना भाजपच्या ताब्यात दिली. मी याबाबत आव्हान केले आहे. पोलिसांना बाजूला ठेवा, लोकांना गोळा करू आणि विचारू शिवसेना कुणाची आहे. मला अशोक चव्हाण यांचे आश्चर्य वाटते. आजपर्यंत सगळ्या जागा वाटपात वाटून घेण्यासाठी प्रयत्न करत होते आणि आता गेले, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाणांवर हल्लाबोल केला.
तुम्ही भ्रष्टचार करा, आम्ही तुम्हाला आमदार, खासदार करणार. तुमच्या योजना भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या? सगळे भाडोत्री आणले जात आहेत. तुम्ही ८० कोटी लोकांना फुकट धान्य देत असाल, तर मग गरिबी कुणाची हटवली. देशातील सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
काय म्हणाले नाना पटोले?
काँग्रेस पक्ष आज संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत आहे. असे असताना सर्व मिळालेले नेते काँग्रेसला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जाते, हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी नेटाने लढणार.