बीड : अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर अंबड पोलिसांनी गेवराईमधून अजित पवार राष्ट्रवादी गटाचे युवक तालुका अध्यक्ष ऋषिकेश बेदरे आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली.
ही अटक म्हणजे गेवराईतील काही नेत्यांनी पूर्ववैमनष्यातून रचलेला कट असल्याची प्रतिक्रिया देत, अजित पवार गटाचे नेते विजयसिंह पंडित यांनी अटकेचा निषेध करण्यासाठी मराठा बांधवांच्या वतीने गेवराई तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संगितले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विजयसिंह पंडित यांनी केली असून, बेदरेवरील गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
ऋषिकेश बेदरे हा अजित पवार गटाचा राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष असून मराठा आरक्षण आंदोलनामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. आंतरवाली सराटीमध्ये जेव्हा पोलिसांवर दगडफेक झाली त्यामध्ये ऋषिकेश बेदरी याला मुख्य आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक बंदूक आणि जिवंत काडतूसदेखील जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी दगडफेक प्रकरणात अटक झालेला ऋषीकेश बेदरे आणि शरद पवार यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? असा सवाल त्यांनी फोटो ट्वीट करताना विचारला आहे. पवार साहेब, पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? असा सवाल देखील नितेश राणे यांनी विचारला आहे.
नितेश राणेंनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये दगडफेकीतील मुख्य आरोपी हृषीकेश बेदरे, शरद पवार, राजेश टोपे आहेत. १ सप्टेंबर रोजी पोलिसांवर दगडफेक तर तीन सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब महाराष्ट्राला कोण अशांत करतंय? असा सवाल त्यांनी विचारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.