बीड : बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्या दोन समर्थकांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटना ताज्या असतानाच आज आणखी एका मुंडे समर्थकांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
गणेश (उर्फ) हरिभाऊ भाऊसाहेब बडे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथे आज घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यात पुन्हा एका पंकजा मुंडे समर्थकाने मुंडे यांचा लोकसभेतील पराभव जिव्हारी लागल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, पंकजा मुंडे या लोकसभेच्या निकालानंतर आजपासून बीड जिल्ह्यातील आभार दौऱ्यावर आहेत. त्या बीडच्या आष्टी तालुक्यातील इंदेवाडी येथील तसेच डिघोळआंबा येथे जाऊन लोकसभेच्या पराभवानंतर पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर बाहेर पडल्या आहेत. अशातच पुन्हा एका व्यक्तीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंकजा मुंडे यांची कार्यकर्त्यांना विनंती
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलण्याची विनंती केली होती. तुम्हाला माझी शपथ आहे, जीवाचं बरवाईट करु नका, अशी कळकळीची विनंती पंकजा मुंडे यांनी केली होती. यानंतर आता ही आत्महत्येची घटना समोर आली आहे.